कै. यशवंत मोरेश्वर देवस्थळी यांचे सहयोगी श्री. आनंद आशय यांनी त्यांच्याबद्दल खास आपल्या DNS बँकेसाठी लिहिलेला लेख

    
|

 

यशवंत मोरेश्वर देवस्थळी--- एक मानवंदना

यशवंत मोरेश्वर देवस्थळी, लार्सन अँड टूब्रो हया भारतातील एका अत्यंत professional औद्योगिक संस्थेच्या जगतातील एक लखलखता तारा, १८ नोव्हेंबर २०२० रोजी निखळून पडला आणि लार्सन अँड टूब्रोमधे त्यांच्या संपर्कात आलेल्या आणि त्यांच्या बरोबर काम केलेल्या हजारो आजी व माजी कर्मचाऱ्यांच्या मनावर एक दुःखाचे गर्द सावट सोडून गेला. ह्या हजारो कर्मचाऱ्यांच्या मधे मी देखील एक होतो.

यशवंत मोरेश्वर देवस्थळी हे जरी त्यांचे संपूर्ण नाव असले तरी L&T मधे ते त्यांच्या initials वरूनच सर्वांना परिचित होते ....म्हणजेच YMD ! कोण होते YMD आणि त्याच्या जाण्याने का बरं त्यांचे असंख्य सहकारी एव्हढे हळहळले?

ह्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या आधी YMD ह्यांचा व्यावसायिक प्रवास कसा होता हे संक्षेपाने जाणून घेणे महत्वाचे आहे. मुंबईतील गिरगाव येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेले YMD बी. कॉम. , CA and LLB करून १९७४ साली L&T मधे ज्युनिअर श्रेणीत रुजू झाले.

कुशाग्र बुद्धिमत्ता, आपल्या विषयांचे सखोल ज्ञान, माणसे जोडायची कला आणि आयुष्यभर आपले कुतूहल व ज्ञान संपादनाची आस कायम ताजी ठेवणारे YMD अत्यंत वेगाने वरच्या वरच्या cadre मधे promote होत गेले.

सप्टेंबर १९९० मधे त्यांची नेमणूक General Manager, Finance & Personnel, म्हणून करण्यात आली. १९९५ साली L&T च्या संचालक मंडळाचे सदस्य -----Director, Finance ---म्हणून निवडले गेले आणि नंतर CFO ----Chief Financial Officer म्हणून जबाबदारी सांभाळू लागले.

L&T हा एक महाकाय उद्योग समूह होता (आहे) आणि त्यामध्ये असंख्य आणि विविध प्रकारचे Strategic Business Units, अनेक subsidiaries/associate companies, अनेक Special Purpose Vehicles, तसेच खूप विस्तीर्ण असे dealers/stockists चे जाळे असे एक प्रचंड औद्योगिक साम्राज्यच होते म्हणा ना ! ह्या साम्राज्याच्या Finance, Accounts, Legal, Personnel, HR, Information technology अशा विविध बाबींची जबाबदारी त्याच्या समर्थ खांद्यांवर होती आणि ती त्यांनी उत्तम रीतीने हाताळली.

२०११ मध्ये मुख्य L&T मधून निवृत्त होऊन YMD ह्यांची नेमणूक L&T Financial Services (LTFS) ह्या L&T च्या subsidiary कंपनीचे पहिले Chairman व Managing Director म्हणून झाली. वित्तीय सेवेच्या क्षेत्रातील देवस्थळींचा दांडगा अनुभव लक्षात घेऊन Reserve Bank of India ने त्यांची नेमणूक एका विशेष समितीवर केली होती ह्याचा उल्लेखही इथे योग्यच ठरेल. Credit culture अधिक सशक्त करण्याच्या हेतूने Public Credit Registry (PCR) साठी एक आराखडा तयार करणे ही जबाबदारी ह्या समितीवर सोपवण्यात आली होती.

YMD ह्यांच्या निधनाचे वृत्त ऐकताच आपली प्रतिक्रिया देताना श्री. डी. दुभाषी, L&T Finance Holdings चे MD व CEO, म्हणाले कि देवस्थळी पुढील दोन गोष्टींच्यासाठी कायम स्मरणात राहतील: sharp business acumen आणि personnel management skills त्यांच्या खाजगी जीवनातही त्यांची सहृदयता आणि ऋजुता ह्याची अनेक उदाहरणे आहेत. आपली पत्नी लीना ह्यांच्यासह ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नाकडे त्यांनी विशेष लक्ष दिले होते. त्याचाच भाग म्हणून महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात चैतन्य ज्येष्ठ नागरिक सहनिवास ह्या नावाचा एक आगळावेगळा वृद्धाश्रम त्यांनी स्थापन केला होता. L&T Group मधे असताना स्तुत्य अशा निवडक सामाजिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांच्या साठी ते जातीने लक्ष घालून मदतीचा हात पुढे करत असत.

२०१७ मध्ये LTFS मधून ते निवृत्त झाले आणि एका अर्थाने corporate विश्वातून त्यांनी निवृत्ती घेतली. माझ्या L&T च्या ३३ वर्षांच्या सेवाकाळात त्यांच्याशी जवळचा संबंध नेहमी येत असे. माझ्या कामाचे स्वरूप Corporate/Marketing Communications शी संबंधित होते. त्यामुळे माझा जो कोणी बॉस असेल ती/तो थेट Board of Directors ना report करायचे. त्यामुळे मी व कंपनीचे संचालक ह्याच्यात नेहमी एकाच पायरीचे अंतर असे. अर्थातच देवस्थळींच्या बरोबर professional संबंध कायम येत असे. त्यामध्ये media बरोबर त्याच्या मुलाखती आयोजित करणे हा एक भाग असे. तो एक अत्यंत आनंददायक व समृद्ध करणारा अनुभव असे. त्यांचा professional competence आणि माणसाला आपलेसे करण्याची हातोटी, ह्यामुळे मुलाखत घेणारी / घेणारा पत्रकार खुष होऊनच परतत असे.

कलासक्त देवस्थळी उत्तम गात असत.... L&T च्या विविध gatherings मधे ते एखादे गाणे नक्की सादर करीत असत. मराठी भावगीत हा त्याचा आवडता गायनप्रकार होता. श्रोत्यांच्या मधे अनेक अमराठी मंडळी अर्थातच असत. त्यामुळे गाणे सुरु करण्याआधी त्या गाण्याच्या अर्थाचा गोषवारा इंग्लिश मधून ते आवर्जून सांगत. नाट्य-चित्र विश्वाचाही वेध ते बारकाईने घेत असत. मी L&T Group मधून २०१४ साली निवृत्त झालो परंतु YMD संपर्कात होते.

एक दिवस अचानक त्यांचा एक WhatsApp message आला. तो एक विडिओ होता. उत्सुकतेने मी तो पहिला. एका मराठी चित्रपटाचा trailor होता तो. राजवाडे अँड सन्स हे त्याचे नाव होते. ह्या मराठी चित्रपटाची निर्मिती त्यांनी केली होती. एका नामांकित सुवर्णकार परिवारातील तरुण पिढीची इच्छा असते कि कोणत्या तरी वेगळ्या business मधे भरारी घ्यावी पण जुन्या पिढीतील कुटुंब प्रमुख ह्या विचारांच्या कट्टर विरोधात असतात. ह्या नाट्यपूर्ण संघर्षावर आधारित हा अत्यंत दर्जेदार असा हा चित्रपट होता. मी trailor पाहून त्यांना phone केला व म्हणालो की trailor पाहून खूप उत्सुकता निर्माण झाली आहे चित्रपट पाहायची. थोड्या गप्पा झाल्या आणि ते म्हणाले की " हा trailor तुमच्या मित्रमंडळींशी अवश्य share करा आणि सर्वांना विनंती करा की चित्रपट release झाला की चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट बघा." अर्थातच आम्ही सर्वांनी theater मधे जाऊन हा चित्रपट पहिला आणि आमच्या आग्रहावरून इतर अनेकांनी देखील हा चित्रपट theater मधे जाऊन पहिला.

मी जेव्हा त्यांना हे सर्व कळवले तेव्हा माझी प्रामाणिक प्रतिक्रिया जाऊन घेण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मला जे वाटले ते मी त्यांना मोकळॆपणे कळवले आणि त्यात असलेला एक छोटासा टीकेचा मुद्दाही त्यांनी आनंदाने स्वीकारला.

ह्या त्यांच्या स्वभावाचा अनुभव L&T च्या सेवेत असतानाही आला होता. तो प्रसंग अविस्मरणीय तर होताच पण माझ्यासाठी मोठा कसोटीचा होता. L&T चे नोंदणीकृत कार्यालय व जागतिक मुख्यालय (L&T House), हे दक्षिण मुंबईतील Ballard Estate भागात होते. माझ्या ३३ वर्षाच्या L&T Group मधील २३ वर्षांचा काळ L&T House येथेच व्यतीत झाला होता. आमचे department इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर होते तर Chairman आणि सर्व Directors पहिल्या मजल्यावर होते. एक दिवस माझ्या intercom ची घंटा वाजली. फोन उचलला आणि समजले कि YMD बोलत आहेत. " काय करताय? जर खूप busy नसाल तर थोडा वेळ खाली माझ्या office मधे येऊन मला भेटू शकाल का आत्ता?"

L&T चे Finance Director आणि CFO बोलवत होते ...त्यांच्या आर्जवपूर्ण आणि ऋजू स्वभावाला साजेश्या शैलीत ! अर्थातच मी लगेच पहिल्या मजल्यावर त्यांच्या cabin मधे दाखल झालो. मनात थोडी उत्सुकता आणि थोडी आदरयुक्त भीती होतीच .....

" या, बसा ...., " YMD बोलू लागले आणि लगेच त्यांनी मुख्य मुद्द्याला हात घातला. " गेल्याच आठवड्यात L&T Infotech join केलेल्या Software Engineer Trainees (SET) च्या नव्या batch ला उद्देशून मी भाषण केले होते व आपल्या in-house magazine मधे त्या कार्यक्रमावर report लिहिण्यासाठी तुम्ही तिथे हजर होतात. त्या व्यतिरिक्त, तुम्ही आत्तापर्यंत मला अनेक forums मधे बोलताना पाहिले आहे. तर तुमच्या कडून मला असे जाणून घ्यायचे आहे की माझ्या public speaking skills मधे काय सुधारणा करता येतील."

क्षणभर मला काय बोलावे हे समजेना ... इतका मोठा माणूस ...आयुष्यात यशाची इतकी महान उंची गाठलेला आणि तो इतक्या नम्रपणे माझे मत विचारत आहे कि त्याच्या public speaking skills मधे काय सुधारणा करता येतील? अर्थात आमच्या मधे तसा बऱ्याच वर्षांचा rapport होता आणि म्हणूनच मी लगेच स्वतःला सावरून मोकळॆपणे माझी प्रतिक्रिया त्यांना दिली व मला सुचलेले दोन-तीन मुद्दे त्यांच्यासमोर मांडले. त्यांनीही अत्यंत मोकळेपणे त्याचे स्वागत केले.

भारतीय Corporate क्षेत्रात उच्च्पदस्थ व्यक्ती generally ज्याप्रमाणे वागत असत, किंबहुना अजूनही वागतात त्यापेक्षा खूपच वेगळा होता हा त्यांचा स्वभाव...म्हणजे इंगजीत म्हणतात त्याप्रमाणे refreshingly different होता. आणि हा फक्त माझाच अनुभव होता असे नाही तर असंख्य L&T कर्मचाऱ्यांचा देखील असाच अनुभव होता.

एक माणूस दुसऱ्या माणसाशी व्यापार-व्यवहार करतो आहे इतक्या सरळ आणि एका अर्थाने प्रासादिक पातळीवर प्रत्येक human interaction देवस्थळी घेऊन जायचे. आपण कोणीतरी मोठे आहोत आणि आपल्या समोर बसलेला माणूस junior cadre चा आहे आणि ह्याची जाणीव त्याला पदोपदी करून देत, त्याच्यावर कृत्रिम दबाव टाकणे हे त्यांनी कधीच केले नाही. एकीकडे त्यांचा स्वभाव तसा परखड देखील होता आणि दुसऱ्या माणसाशी माणसासारखे सरळ वागणे, प्रेमाने वागणे म्हणजे goody-goody खोटे खोटे चांगले वागणे असेही ते कधीच वागले नाहीत.

त्यामुळे Board of Directors मधील त्याच्या सहकाऱ्यांच्या बरोबर , तसेच त्यांच्या bosses बरोबर देखील बोलताना त्यांच्या व्यक्तिमत्वातील सच्चेपणा आणि कणखरपणा कधीच लपून राहिला नाही. त्यामुळे अर्थातच L&TGroup मधे सगळीकडेच त्यांचा एक दबदबाही असे.... त्यांच्या intellectual stature मुळे आणि त्यांच्या सच्चेपणामुळे. असे Corporate leaders फारच विरळा. YMD, आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही.

----आनंद आशय*

*लेखक L&T Group मधून Assistant General Manager, Marketing Communications, म्हणून L&T Infotech, मधून २०१४ मधे निवृत्त झाले आणि पुणे येथे स्थायिक आहेत. त्यांची ई-मेल id आहे [email protected].