डोंबिवली बँकेची वृध्दींगत नफ्याची सुवर्ण महोत्सवी परंपरा कायम

03 Dec 2020 12:24:18

 

डोंबिवली नागरी सहकारी बँकेने, गेली 50 वर्षे सातत्याने प्रतिवर्षी आपला नफा वृध्दींगत करण्याची परंपरा याहीवर्षी कायम ठेवली आहे. आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये सर्व तरतुदी वजा करून ` 38.82 कोटी इतका निव्वळ नफा मिळविला आहे. बँकेने आपला वार्षिक अहवाल वेबसाईटवर प्रसिध्द केला आहे. यावेळची वार्षिक सभा ही सुवर्ण महोत्सवी वर्षातील सभा असल्याने आवश्यक त्या परवानग्या व योग्य ती काळजी घेऊन सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत सदर सभेचे नियोजन लवकरात लवकर करण्यासाठी बँक प्रयत्नशील आहे.

बँकेचे आर्थिक वर्ष 2019-20 चे वैधानिक लेखापरीक्षण पूर्ण झाले असून 31 मार्च 2020 रोजी बँकेच्या ठेवी ` 4287 कोटी, कर्जव्यवहार ` 2658 कोटी तर गुंतवणूका ` 1227 कोटी आहेत. बँकेचा मिश्र व्यवसाय ` 6945 कोटी आहे. या आर्थिक वर्षात निर्लेखित कर्जांमधून ` 39 कोटी इतकी धडाकेबाज वसूली केली आहे.

कोरोनामुळे झालेली टाळेबंदी, त्यामुळे ओढावलेलं आर्थिक संकट यावर मात करण्यासाठी बँकेने विविध उपाययोजना तातडीने अंमलात आणल्या. छोट्या – मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच वैयक्तिक अडी-अडचणी सोडविण्यासाठी विविध कमी व्याजदराच्या कर्ज योजना सुरु केल्या. त्याचप्रमाणे गृह, वाहन, सुवर्णतारण कर्ज योजनांच्या व्याजदरात कपात केली आहे. ग्राहकांचा या कर्ज योजनांना चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

कमी व्याजदराच्या कर्ज योजनांबरोबरच, नफाक्षमता टिकवून ठेवण्यासाठी काटकसरीचे अनेक मार्ग बँकेने अवलंबिले आहेत.

सामाजिक अंतर राखण्याची आवश्यकता लक्षात घेऊन शाखांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी मोबाईल बँकींगला प्रोत्साहन देण्याचे धोरणही बँकेने अवलंबिले. त्याचबरोबर कोविड-19 चा प्रतिकार करण्यासाठी कोरोना कवच ही विमा पॉलिसी ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे.

डोंबिवली शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या व कोरोनामुळे रुग्णाला भेडसावणारी ऑक्सिजनची कमतरता लक्षात घेऊन समाजातील गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन मशिन्स अनिता रुग्ण सहाय्य केंद्र, डोंबिवली यांचेकडे सुपूर्द केली आहेत.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पी.एम. केअर फंड, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व रा. स्व. संघ जनकल्याण समिती या संस्थांना डोंबिवली बँक परिवाराच्या वतीने ` 32 लाखांचा निधी सुपूर्द केला गेला आहे. तसेच सर्व अधिकारी-कर्मचा-यांसाठी कोरोना उपचारांसाठी एक लाखांच्या विमा पॉलिसीचा प्रिमियम बँकेने अदा केल्याने कर्मचा-यांमध्ये समाधानाचे वातावरण वृध्दींगत झाले आहे.

-0-0-0-0-


50thAnni_sqr_1  
Powered By Sangraha 9.0