डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे सुवर्ण महोत्सवी वर्षात दमदार पदार्पण

    
|
दि. ६ सप्टेंबर, १९७० रोजी डोंबिवली येथे केवळ ४८७ सभासदांकडून जमा केलेल्या रु.६०,६००/- च्या भाग-भांडवलावर बँकेचा शुभारंभ झाला. पहिल्या दिवशी २८७ खाती व रु.२५,३००/- च्या ठेवी गोळा झाल्या होत्या. आज बँकेचे सुमारे १ लाख सभासद असून, भाग-भांडवल रु. १५०/- कोटी पर्यंत पोहोचले आहे.
 
50thAnni_sqr_1  
आज रोजी बँकेचा मिश्र व्यवसाय रु. ७,७००/- कोटींहून अधिक असून, बँकेच्या महाराष्ट्रातील १५ जिल्ह्यात ६९ शाखा कार्यरत आहेत. बँकेला बहुराज्यीय दर्जा (मल्टी स्टेट) मिळाला असून, सुरुवातीपासून ऑडिट वर्ग "अ", प्रतिवर्षी वृद्धिंगत नफा मिळविणारी तसेच चांगला लाभांश देणारी बँक असा लौकिक प्राप्त झाला आहे. याच आर्थिक सक्षमतेमुळे डोंबिवली बँकेकडे विलीनीकरणासाठी अन्य 4-5 बँकांचे प्रस्ताव सध्या प्राप्त झाले आहेत.
 
शिक्षणाचे महत्त्व ओळखून रु. ६०/- लाखांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज बँकेने उपलब्ध केले आहे. त्याचप्रमाणे, अन्य वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाची नियमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या ग्राहकांना व्याजदरात १% ते २% सवलत देत त्यांचे कर्ज शिफ्ट करून घेण्याची योजना बँकेने कार्यान्वित केली आहे. किंमतीच्या ९५% पर्यंत गृहकर्ज, १००% वाहन कर्ज, केवळ ९.९५% व्याजदराचे सुवर्ण तारण कर्ज, पगारदार नोकरांसाठी सॅलरी ओव्हरड्राफ्ट, तर निवृत्त वेतनधारकांसाठी कर्ज इ. बँकेच्या वैशिष्ट्यपूर्ण कर्ज योजना आहेत.
 
डी.एन.एस. गोल्ड हे ६% व्याज देणारे बचत खाते, कमाल व्याज देणारी डी.एन.एस.बी. एस.आय.पी. योजना, कर बचत आणि चांगला परतावा देणारी शुभंकर योजना इ. बँकेच्या आकर्षक ठेव योजना आहेत.
 
आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्यात बँक नेहमीच आघाडीवर राहिली आहे. मोबाइल बँकिंग, रूपे डेबिट कार्डची सेवा देणारी पहिली सहकारी बँक म्हणून गणली जाते. भीम, फोन पे, गुगल पे, पेटीएम अॅप इ. बरोबरही डोंबिवली बँकेचे खाते जोडणे शक्य असून, त्याद्वारे तसेच बीबीपीएस च्या माध्यमातून वीज, टेलिफोन, मोबाईल बिले तसेच डीटीएच, मोबाईल रिचार्ज करणे सोपे झाले आहे. बँकेने पॉस (पॉईंट ऑफ सेल) मशिन्सची तसेच क्यू. आर. कोडची सुविधा उपलब्ध केली असून, अनेक व्यावसायिक आस्थापना, दुकानदार याचा लाभ घेत आहेत.
 
सभासद तसेच ग्राहकांसाठी घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा, महिला ग्राहक / सभासदांसाठी जागतिक महिला दिनी मेळाव्याचे आयोजन, सभासद / ग्राहकांच्या सहभागाने दिनदर्शिकेचे निर्माण इ. उपक्रमही यशस्वीरित्या राबविले जातात.
 
बँकिंग बरोबरच सामाजिक जाणिवेने काम करणारी बँक म्हणून डोंबिवली बँकेची ओळख आहे. सामाजिक, सांस्कृतिक, ग्रामीण, वनवासी, वैद्यकीय, शैक्षणिक अशा क्षेत्रात कार्यरत असलेल्या सुमारे दोनशेहून अधिक संस्थांना काही कोटींची मदत केली आहे. त्याचबरोबर समाजातील तळागाळातल्या जनतेच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्थेस समाजमित्र तसेच सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्थेस अथवा व्यक्तीस सहकार मित्र पुरस्कार बँकेच्या वतीने प्रदान केला जातो.
 
देशभरात आज सुमारे १५०० सहकारी बँका कार्यरत आहेत. सहकारी बँकिंग क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेची गणना देशभरातील पहिल्या १५ सहकारी बँकांमध्ये केली जाते. आपल्या सर्वसमावेशक कामगिरीमुळे महाराष्ट्र अर्बन को.ऑप. बँक्स् फेडरेशन तसेच महाराष्ट्र नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनने डोंबिवली बँकेला अनेकदा सन्मानितही केले आहे.
 
आर्थिकदृष्ट्या तसेच आधुनिक तंत्रज्ञानाने समृध्द व सक्षम बँक बनवत असताना, संवेदना न गमवता, सामान्य माणसाच्या हितासाठी काम करण्याचा तसेच ग्रामीण व निमशहरी भागात आपला पाया विस्तारण्याची योजना अंमलात आणण्याचा निर्धार संचालक मंडळाने सुवर्ण महोत्सवाच्या निमित्ताने व्यक्त केला आहे.