डोंबिवली नागरी सहकारी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

    
|
सक्षम सहकारी बँकेच्या सर्व निकषांची पूर्तता
 

 
डोंबिवली - डोंबिवली नागरी सहकारी बँकेची ४९वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २२ सप्टेंबर, २०१९ रोजी संपन्न झाली. या सभेस १५०० हून अधिक सभासद उपस्थित होते. बँकेचे नफा- तोटा पत्रक व ताळेबंद याबाबतची सविस्तर माहिती मा. संचालक सी.ए.श्री. पित्रे व सी.ए.श्री. शेलार यांनी दिली. २०१८-१९ या आर्थिक वर्षात बँकेने रु. ३७.८० कोटी निव्वळ नफा मिळविला. या नफ्यातून कायदेशीर तरतूदी वजा जाता, संचालक मंडळाने सुचविलेला १२% लाभांश सभेने मंजूर केला. भागधारक कल्याण निधीसाठी रु. १०/- लाखांची तसेच सामाजिक संस्थांसाठी धर्मादाय निधी म्हणून रु. ३०/- लाखांची तरतूदही सभेने मंजूर केली. मा. संचालक मंडळातील सदस्यांनी सभासदांच्या सर्व शंकांचे निरसन केले.
 

 
“आज रोजी बँकेचा मिश्र व्यवसाय ७,४००/- कोटी हून अधिक आहे. बँकेची भांडवल पर्याप्तता, जी किमान ९% हवी, ती १२.७७% आहे. सक्षम सहकारी बँक ओळखली जाण्याचे भारतीय रिझर्व्ह बँकेचे विशिष्ट निकष आहेत. रिझर्व्ह बँकेचे असे सर्व निकष आपण पूर्ण करत असून, आपली बँक एक सक्षम सहकारी बँक म्हणून गणली जाते. अनिवासी भारतीयांची खाती (NRE) बँकेच्या सर्व शाखांमध्ये उघडण्यास रिझर्व्ह बँकेने नुकतीच अनुमती दिली आहे. त्याचप्रमाणे प्रेफरन्स शेअर्स द्वारे रु. ४९/-कोटीचे नवीन भागभांडवल उभारण्यासही रिझर्व्ह बँकेने नुकतीच परवानगी दिली आहे” असे बँकेचे मा. अध्यक्ष सी.ए.श्री. उदय कर्वे यांनी वार्षिक सभेत सांगितले.
 
सभेतील सर्वच्या सर्व ठराव योग्य त्या चर्चेनंतर एकमताने मंजूर झाले. उपस्थित सभासदांनी बँकेच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले व संचालक मंडळ, अधिकारी, कर्मचारी यांच्या अभिनंदनाचा ठरावही एकमताने व टाळ्यांच्या गजरात सभेने मंजूर केला.