डोंबिवली बँकेचा अनुदान वितरण व पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न

DNS Bank    27-Mar-2019
    "आपण जागरूक असणे,ही देखील सामाजिक बांधिलकी' - रमेश पतंगे   
 
 'यथा राजा, तथा प्रजा' ही म्हण सर्वार्थाने रूढ आहे. राजा जसा वागतो तशी प्रजा वागत असते. म्हणूनच आपल्यावर राज्य करणारा राजा कसा असावा, याचा अधिकार लोकशाहीने आपल्याला दिला आहे. म्हणूनच देशहितासाठी कामे करणारे सरकार निवडून आले पाहिजे या हेतूने मतदान  करा. आपण जागरूक असणे ही देखील एका प्रकारे सामाजिक बांधिलकीच आहे" असे प्रतिपादन ज्येष्ठ  विचारवंत व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे मा.अध्यक्ष श्री. रमेश पतंगे यांनी येथे केले.
        
 डोंबिवली नागरी सहकारी बँकेने योजिलेल्या धर्मादाय निधी व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ''पारंपरिक बँकिंग करत असतानाच सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेने डोंबिवली बँकेने योजलेला हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे. तुम्ही सर्वजण अधिक जोमाने काम करून  बँकेने आपल्यावर व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवाल अशी खात्री आहे." असेही  ते म्हणाले. याप्रसंगी अनेक प्रेरणादायी उदाहरणे सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केले.  
   
 या कार्यक्रमात मा. रमेशजी पतंगे यांच्या हस्ते शुश्रुषा सिटिझन्स को.ऑप. हॉस्पिटलचे मा. अध्यक्ष डॉ. नंदकिशोर लाड यांना 'सह्कारमित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना डॉ. लाड म्हणाले, 'आरोग्य,शिक्षण आणि स्वछता या क्षेत्रात यश मिळवायचे असेल तर ते सहकाराच्या माध्यमातून मिळू शकेल, त्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. सहकाराच्या माध्यमातूनच सर्वसामान्यांना परवडू शकेल असे उपचार मिळू शकतात, हे शुश्रुषा हॉस्पिटलने सिद्ध केले आहे. अशा प्रकारची सहकारी हॉस्पिटल्स देशभर उभी रहायला हवीत", असे प्रतिपादन डॉ. लाड यांनी केले. 
 
  राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत या संस्थेला या वर्षीचा 'समाजमित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. "या पुरस्कारामुळे आमच्यावरील जवाबदारी वाढली आहे. ही जवाबदारी पार पाडण्याचा आम्ही निश्चितच प्रयत्न करू." अशी ग्वाही याप्रसंगी संस्थेचे प्रांत सहकार्यवाह श्री. अरुणजी डंके यांनी दिली. परिवर्तन महिला संस्थेच्या अध्यक्षा ज्योतीताई पाटकर यांनाही 'समाजमित्र पुरस्कार' प्रदान करण्यात आला. आपल्या भाषणात त्यांनी संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच सहकार्याबद्दल बँकेचे आभार मानले. 
 
  कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेचे मा. अध्यक्ष श्री. उदय कर्वे यांनी प्रास्ताविक केले. "हा कृतज्ञतेचा मेळावा आहे. आपल्या जीवनातील महत्वाचा वेळ खर्च करून आपण जे सामाजिक कार्य उभे केले आहे ते निश्चितच स्फूर्तिदायक आहे. आपल्याला सहाय्यभूत ठरू शकेल असा आर्थिक सहाय्याचा एक खारीचा वाटा उचलण्याचं भाग्य आम्हाला मिळतंय त्याबद्दल आमच्या मनात खरोखरच कृतज्ञतेची भावना आहे." असे त्यांनी आवर्जून सांगितले. 
         
  या कार्यक्रमात एकूण १२२ संस्थांना सुमारे ₹ ३०/- लाखांचा निधी वितरित करण्यात आला. पुरस्कारार्थींना देण्याचे आलेल्या मानपत्रांचे वाचन मा.संचालक सर्वश्री मिलिंद आरोलकर, योगेश वाळुंजकर व महेश फणसे यांनी केले. तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय सरव्यवस्थापक श्री. परांजपे यांनी करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.नम्रता सावंत व सौ. श्वेता नानिवडेकर यांनी केले. कार्यक्रमास साजेसे वैयक्तिक गीत सौ. मधुरा देशमुख यांनी म्हंटले. 
 
  कार्यक्रमास रिझर्व्ह बँकेचे संचालक मा.श्री. सतीश मराठे, बँकेचे आजी-माजी संचालक तसेच अनेक संस्थांचे मान्यवर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  
Puraskarsohala        

 
 
 
 
 
Puraskarsohala 
              
.           


          
Puraskarsohala