‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ परिसंवादात डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सहभाग
निरामय आरोग्य प्राप्त करण्यासाठी शारीरिक आणि मानसिक स्तरावर प्रयत्न करणे गरजेचे आहे. हे प्रयत्न नेमके कसे असावेत, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आयोजित ‘लोकसत्ता आरोग्यमान भव’ या परिसंवादाचा बँकिंग पार्टनर म्हणून 'डोंबिवली नागरी सहकारी बँके'ने सहभाग घेतला असून यावेळी उपस्थितांना बँकेच्या प्रतिनिधींकडून विविध कर्ज व ठेव योजना सविस्तर जाणून घेता आल्या. तसेच आरोग्य विमा संदर्भातही यावेळी माहिती देण्यात आली. बदलत्या जीवनशैलीने माणसाचे आयुष्य सुखकर झाले आहे, मात्र त्याबरोबरच अनेक व्याधीही जडू लागल्या आहेत. याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ‘लोकसत्ता’ने ठाणे येथे ‘आरोग्यमान भव’ परिसंवादाचे आयोजन केले होते. दि.१५ व १६ मार्च रोजी सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
निरोगी जीवनाचा मार्ग पोटातून जातो. आहारावर लक्ष देणे आवश्यक असून घरच्या घरी कमीत कमी वेळात तयार केले जाणारे पौष्टिक पदार्थ, त्यांच्या निरनिराळ्या पद्धती आणि शरीराला होणारे फायदे यावर आहारतज्ज्ञ डॉ. शिल्पा जोशी (१५ मार्च) आणि आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. अरुणा टिळक (१६ मार्च) यांनी ‘घरच्या घरी पौष्टिक आहार’ या परिसंवादामध्ये मार्गदर्शन केले. तर व्यायाम करायला वेळ नाही, ही सबब देणाऱ्यांसाठी योग हा उत्तम पर्याय कसा ठरू शकेल याचा उलगडा ‘योग आणि आरोग्य’ या व्याख्यानात आयुर्वेद आणि योगतज्ज्ञ डॉ. आशीष फडके यांनी केला. तसेच ‘महिलांचे मानसिक आरोग्य’ या विषयावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये यांनी संवाद साधला.