चांगली कला सशक्त समाज घडवतो : सोनिया परचुरे

चांगली कला सशक्त समाज घडवतो : सोनिया परचुरे

डोंबिवली, 8 मार्च : कोणतीही कला चांगलीच असते, मात्र काहीतरी सिद्ध करण्यासाठी, करून दाखवण्यासाठी कलेचा उपयोग करणे चुकीचं आहे केवळ चांगल्या कलेतूनच आनंद निर्माण होतो आणि त्यातूनच सशक्त समाज घडत असतो, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे यांनी येथे केले. डोंबिवली नागरी सहकारी बँकेने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या महिला मेळाव्यामध्ये त्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या.

 योग्य काय आयोग्य काय याची जाणीव आपल्याला असायला हवी. आपल्याला मिळणाऱ्या मोकळेपणाचं, स्वातंत्र्याचं सोन करता यायला हव. आजच्या काळात  अट्टाहासान काही चुकीच्या गोष्टी केल्या जातात. स्त्रीत्व सोडून, ताळमेळ सोडून केली जाणारी कृती चुकीची आहे. हे मात्र कोणीतरी पुढे येऊन सांगण्याची नितांत आवश्यकता आहे. असेही त्यांनी यावेळी निक्षून सांगितले. 

 प्रसिद्ध मनोविकार तज्ज्ञ आणि इन्स्टिटयूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ या संस्थेच्या विश्वस्त डॉक्टर शुभा  थत्ते यांनीही आपले विचार याप्रसंगी व्यक्त केले. स्त्रीला स्वतः पासूनच सुटका करून घेण्याची आवश्यकता आहे. स्त्रीने प्रगतीसाठी स्वतः मध्ये बदल घडवायला हवा. स्त्रियांमध्ये दुसऱ्याच्या भावना समजून घेण्याचा चांगला गुण असतो. स्रीयांनी भिडस्त / सोशिक स्वभाव हळूहळू बदलला पाहिजे. आपल्या अपेक्षांचं रूपांतर मागण्यांमध्ये झालं कि समस्यांना सुरवात होते, म्हणूनच आपल्यामध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करणे आवश्यक आहे. असे आग्रही प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केले.

 कार्यक्रमात विविध क्षेत्रातील १० महिलांचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये उद्योजिका प्रतिभा पिळगावकर,शीला ठक्कर, शिल्पा नातू, सायली जोशी, वनिता साळवी, शैक्षणिक क्षेत्रातील शुभदा अघोर, अर्चना शिंदे, पत्रकार जान्हवी मोर्ये, वैद्यकीय क्षेत्रातील ऐश्वर्या जुवेकर तर कला क्षेत्रातील निकिता साठे यांचा समावेश होता.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेच्या मा.संचालिका सौ. पूर्वा पेंढरकर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीविषयीची माहिती सांगितली. बँकेच्या मा. संचालिका सौ. मेघना आंबेकर व बँकेच्या भागधारक कल्याण निधीच्या सदस्या सौ. रुपाली साखरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नम्रता सावंत व अनुया पिंगळे यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

© Copyright 2018 dnsbank, All Rights Reserved

Powered By - Bharati Web