इरादे नेक हो तो सफलता जरूर मिलती है: माधुरी सहस्रबुद्धे

DNS Bank    24-Mar-2018


इरादे नेक हो तो सफलता जरूर मिलती है: माधुरी सहस्रबुद्धे

पुणे, 10 मार्च : आपल्याला काहीतरी मिळवण्यासाठी काही काम करायचं ही वृत्ती सोडून द्यायला हवी. आपला उद्देश चांगला असेल तर आपल्याला यश नक्की मिळते. असे आश्वासक उद्गार पुणे महानगरपालिकेतील मा. नगरसेविका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी येथे काढले. जागतिक महिला दिनानिमित्त पुणे येथे डोंबिवली नागरी सहकारी बँकेने महिला मेळाव्याचे आयोजन दि. १० मार्च २०१८ रोजी केले होते. त्या मेळाव्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सौ. सुमित्रा भंडारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

 इरादे नेक हो तो सफलता जरूर मिलती है हे मा. मोदीजींचे वाक्य मी माझ्या मनावर कोरले आहे. त्यामुळे दुसऱ्यांच्या उपयोगी पडताना मनस्वी आनंद मिळतो. आपणही आपल्यातील गुणांचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा त्यामुळे आपल्यालाही समाधान मिळेल. असेही त्यांनी याप्रसंगी सांगितले.

 आपण एखाद्या संस्थेत नोकरी करत असाल तरी ती नोकरी म्हणून न करता एक जबाबदारी म्हणून त्याच्याकडे बघा. त्यातून तुमचा दृष्टिकोन निश्चितच बदलेल. आपल्या कार्याने आपली ओळख निर्माण होईल असे प्रयत्न केले पाहिजेत. असे आग्रही प्रतिपादन मा. सौ. सुमित्रा भंडारी यांनी येथे व्यक्त केले.

 कार्यक्रमात सामाजिक कार्यकर्त्या मानसी घुले, वसुधा देशपांडे, अनुराधा भंडारे, लघु उद्योजिका मृणाल भोसले, प्रमिला सरमंडळी,सई शेवडे, निसर्गप्रेमी प्रिया भिडे, सांस्कृतिक क्षेत्रातील नीना बेगमपुरे यांचा सन्मान करण्यात आला.

 कार्यक्रमाच्या प्रारंभी बँकेच्या मा. संचालिका सौ. मेघना आंबेकर यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी बँकेच्या आर्थिक प्रगतीची माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय बँकेच्या मा. संचालिका सौ. पूर्वा पेंढरकर यांनी करून दिला. बँकेच्या विविध योजनांची माहिती मुख्य व्यवस्थापक सौ. वैशाली टोकरे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. नम्रता सावंत यांनी केले. कार्यक्रमास मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.