IndependenceDay

    
|
उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी बँकांचे योगदान महत्त्वाचे --- भूषण मर्दे.
 
डोंबिवली -  "बँक आणि उद्योग यात महत्त्वाचं नात आहे. उद्योग क्षेत्राच्या वाढीसाठी बँकांचे योगदान मोठे आहे. दोन्ही क्षेत्रांची यशस्वीता परस्परांवर अवलंबून आहे. परंतू लघू उद्योग क्षेत्राबाबत थोडा सहानूभूतीपूर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे." असे प्रतिपादन लघू उद्योग भारतीचे मा. सरचिटणीस भूषणजी मर्दे यांनी येथे केले.
 
डोंबिवली नागरी सहकारी बँकेने योजलेल्या स्वातंत्र्य दिन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. " लघू उद्योग क्षेत्रात आज ९४% नोक-या दिल्या जातात,  तर देशाच्या औद्योगिक उत्पादनात ३८% वाटा या क्षेत्राने उचलला आहे. मात्र, उद्योग धोरण ठरविताना लघू उद्योग क्षेत्राला विचारात घेतले जात नाही." अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
 
 "भारत कृषी प्रधान नव्हे तर उद्योग प्रधान देश होता, याचे अनेक दाखले इतिहासात सापडतात. परंतू त्यासाठी इतिहासाच्या पुनर्विचाराची गरज आहे.  बँकींग व्यवसायासमोर आणि लघू उद्योग क्षेत्रासमोर आज अनेक आव्हाने आहे. आपण दोघांनी मिळून या आव्हानांना सामोरे जाउया." असे आवाहनही त्यांनी याप्रसंगी केले.
 
प्रारंभी बँकेचे मा. अध्यक्ष उदय कर्वे यांनी प्रास्ताविक केले. " प्रबळ राजकीय इच्छाशक्ती दर्शविणारे निर्णय घेउन, त्याची अंमलबजावणी करणारे सरकार आज केंद्रात आहे. त्यामुळे आजचा स्वातंत्र्यदिन हा निश्चितच वेगळा आहे. आपली बँक लवकरच सुवर्ण महोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. यावर्षात व्यवसाय वृध्दीबरोबरच, काहीतरी वेगळेपण दाखविणारे, सहकारी बँकिंग क्षेत्राला आदर्शवत ठरेल असे काम आपण करूया." असे त्यांनी आपल्या प्रस्ताविकात सांगितले. तसेच त्यांनी उपस्थितांना  स्वातंत्र्यदिनाच्या व रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. 
 
स्नेहविकास या बँकेच्या गृहपत्रिकेने कर्मचा-यांसाठी अभिव्यक्ती स्पर्धा योजल्या होत्या. या स्पर्धेविषयीची संकल्पना मा. संचालक मिलिंद आरोलकर यांनी मांडली. या स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देउन गौरविण्यात आले. विजेत्या स्पर्धकांनी आपली कला यावेळी सादर केली.
 
याच कार्यक्रमात कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी संचालक निधीतून ₹ ५.०० लाखांचा व कर्मचारी कल्याण निधीतून ₹ १.०० लाखांचा धनादेश रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या पदाधिका-यांकडे सुपूर्त करण्यात आला.
 
अतिथींचा परिचय सरव्यवस्थापक परांजपे यांनी करून दिला. सौ. कृतिका केतकर यांनी वैयक्तीक गीत सादर केले  तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय पेंडसे यांनी केले. 
 
कार्यक्रमास मा. संचालक तसेच अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.