Puarskarsohala

DNS Bank    18-Mar-2019

            डोंबिवली बँकेचा अनुदान वितरण व पुरस्कार प्रदान सोहळा


 डोंबिवली बँकेच्यावतीने दरवर्षी समाजमित्र पुरस्कार व सहकार मित्र पुरस्कार सामाजिक व सहकार क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणा-या संस्थेस अथवा व्यक्तीस प्रदान करण्यात येतो. समाजमित्र पुरस्कार बँकेच्या भागधारक कल्याण निधीच्यावतीने देण्यात येतो. 

     शनिवार, दि.२३ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता सुयोग मंगल कार्यालय, टिळक पथ, डोंबिवली (पूर्व) येथे होणा-या या कार्यक्रमास ज्येष्ठ विचारवंत, साप्ताहिक विवेकचे माजी संपादक व हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे मा. अध्यक्ष श्री. रमेश पतंगे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.             

     संस्कार, आरोग्य, शिक्षण, कृषी, स्वावलंबन, आपत्ती विमोचन व पूर्वांचल प्रदेशाचा विकास या आयामांवर लक्ष केंद्रीत करून सामाजिक क्षेत्रात निरपेक्षपणे भरीव काम करणा-या ``राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, महाराष्ट्र प्रांत’ या संस्थेस यावर्षीचा ``समाजमित्र पुरस्कार’’ प्रदान करण्यात येणार आहे.
     त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना बरोबर घेऊन महिला सक्षमीकरण या मुख्य हेतूने स्थापन करण्यात आलेल्या ``परिवर्तन महिला संस्था, डोंबिवली’ या संस्थेस देखील ``समाजमित्र पुरस्कार’’ प्रदान करण्यात येणार आहे.

      तसेच यावर्षीचा सहकार मित्र पुरस्कार पद्मभूषण मा. प्रा.डॉ. नंदकिशोर लाड यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहून सामान्य नागरिकांच्या सहकार्याने सामान्य नागरिकांसाठी सहकारी तत्वावर हॉस्पिटल सुरू केले आहे. बँकेच्या धर्मादाय निधीतून प्रतिवर्षी बँकेच्या निव्वळ नफ्यातून 1 टक्का रक्कम सामाजिक, शैक्षणिक, वैद्यकीय, सांस्कृतिक व क्रिडा या क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थांना वितरीत केली जाते. ह्यावर्षी 122 संस्थांना 23.50 लाख रूपये रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.         

      तरी नागरिकांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन बँकेचे मा. अध्यक्ष श्री. कर्वे व सरव्यवस्थापक श्री. परांजपे यांनी या प्रसिध्दपत्रकाद्वारे केले आहे.